पैशाला पैसा ओढतो की कष्टाने पैसा येतो?

९० च्या दशकातली एक मालिका आठवते का? त्यात एक श्रीमंत कॅरॅक्टर असते. काही कारणासाठी स्वतःला मुद्दाम तोटा व्हावा असे काहीतरी करत असते. प्रत्येक वेळी कितीही वाईट गुंतवणूक केली तरी त्याला फायदाच होत असतो. एका एपिसोड मध्ये हा अतिश्रीमंत एका टुकार चित्रपट दिग्दर्शकाला चिकार पैसे देऊन सिनेमा काढायला सांगतो. कयास हाच असतो कि नेहमीप्रमाणे तो दिग्दर्शक वाईट चित्रपट तयार करून तो नक्की नुकसान करणार. पण सिनेमा एवढा वाईट असतो कि प्रेक्षक तो एन्जॉय करतात. आणि हा वाईट चित्रपट देखील तुफान हिट होतो. या अतिश्रीमंत माणसाचे नुकसान होणे दूर, त्याला आणखी पैसे मिळून तो अधिक श्रीमंत होतो. असे बरेच विनोदी किस्से या मालिकेत होते. (कुणाला मालिकेचे नाव आठवले तर सांगा)



जोखीम

वरील मालिकेची या प्रश्नाच्या निमित्ताने आठवण झाली. पैसा पैशाला ओढतो कारण ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो त्यांची जोखीम घेण्याची ताकद जास्त असते. ज्याच्याकडे ४-५ कोटी आहेत तो ५० लाखाचा फ्लॅट आरामात घेऊन वर्षभराने ७० लाखाला विकून १०-१५ लाखाचा नफा पदरात पाडू शकतो. किंवा एखाद्या बेभरवशाच्या स्टॉक वर १० लाख लावून त्याचे १ कोटी करू शकतो. त्या १० लाखाचे १ लाख झाले तरी त्याला फार फरक पडणार नाही.

आता ज्यांच्याकडे फार जास्त पैसे नाहीत, त्यांना फार जोखीम घेता येणार नाही हे ओघानेच आले. साहजिकच त्यांच्या आणखी पैसे कमावण्याच्या शक्यता कमी होतात.

तुमच्या यशाची शक्यता तेव्हा वाढते जेव्हा जास्तीत जास्त अपयश पचवण्याची तुमची तयारी असते. १ गोळी एक निशाणा फक्त हिंदी पिच्चर मध्ये होते. प्रत्यक्षात ज्याच्याकडे १००० गोळ्या मारण्याची कुवत असते त्याचा लक्षवेध होण्याची शक्यता ज्याच्याकडे १०च गोळ्या आहेत अशा माणसापेक्षा १०० पट जास्त असणार.


संधी, नेटवर्क

ज्याच्याकडे आधीच जास्त पैसे आहेत त्याला बँक डोळे झाकून लोन देते. हेच कर्जाऊ पैसे वापरून तो मनुष्य आणखी गुंतवणूक किंवा फायद्याचा व्यापार वा उद्योग करू शकतो. धनवान माणसाबरोबर सगळे संबंध जोडू पाहतात त्यामुळे त्यांना अधिकाधिक संधी प्राप्त होतात. उदाहरणार्थ एखाद्या धनवान मनुष्याला दुसऱ्या धनवान मनुष्यांसोबत उद्योगधंदे करता येतात, नवीन कल्पनांवर काम करता येते. सधन मनुष्यांना तज्ञ, जाणकार लोकांचे मार्गदर्शन मिळते किंवा ते विकत घेता येते. त्यामुळे त्यांच्या यशाची शक्यता आणखी वाढते. सधन लोकांच्या व्यावहारिक शहाणपणामुळे असो वा त्यांच्या नेटवर्क मुळे असो, त्यांच्या वाट्याला टगे, लबाड लोक सहसा जात नाहीत. कारण त्यांना गंडवणे तितकेसे सोपे राहत नाही. सामान्यांच्या वाट्याला मात्र संचयनी आणि पॅन कार्ड क्लब येतो.

प्रतिष्ठा, लौकिक, पत, Reputation

श्रीमंत माणसाच्या जग पुढे पुढे करते हे अर्धसत्य आहे. या श्रीमंत मनुष्याने पैसे कोणत्या मार्गाने कमावले आहेत आणि कोणत्या मार्गाने त्याचा व्यय तो करत आहे, तो न्याय्य पद्धतीने व्यवहार करतो का? तो दिलेला शब्द पाळतो का? हे पाहूनच सद्गुणी माणसे त्याच्या आसपास जमा होतात किंवा दूर जातात. त्यामुळे प्राण, आणि संपत्ती पेक्षाही काही गुणिजनांना प्रतिष्ठा, पत महत्वाची वाटते. उदाहरणार्थ एखाद्या गुंठामंत्र्याची, एका उद्योजकाची, एका अभिनेत्याची आणि एका संशोधकाची संपत्ती समान असली तरी त्यांना मिळणारा आदर, संधी आणि त्या संधीची गुणवत्ता यामध्ये निश्चित फरक असणार. व्यवहार न्याय्य असेल तर मग आणखी संधी येतात.


प्रमाण Quantum

असे समजा कि एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यवसाय, व्यापार अथवा स्टॉक मध्ये १ लाखाची गुंतवणूक केली. जोखीम जास्त असल्यामुळे त्याची झोप उडाली. सुदैवाने त्याला १०० टक्के फायदा झाला. म्हणजे १ लाखाचे २ लाख झाले. हा पहिला व्यक्ती नाचत नाचत सर्वांना वर्षभर त्याच्या दिग्विजयाची वार्ता सांगेल.

दुसऱ्या सधन व्यक्तीने एका अगदी बोरिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली होती. त्याला १०% च फायदा झाला. पण या व्यक्तीने १० कोटीची गुंतवणूक केली होती. म्हणजे त्याला फायदा झाला १ कोटी. सकाळचा चहा पिता पिता हा वाढलेला संपत्ती चा आकडा एकदा बघून तो फक्त गालातल्या गालात हसला. नफ्याच्या टक्क्यांच्या गेम मध्ये हि प्रमाण (Quantum) ची गोम असते. त्यामुळे ज्याच्याकडे जास्त पैसे तो कमी जोखीम घेऊनही जास्त कमावतो.

कष्ट

असे म्हणतात की "पैसा माणसाच्या नशीबाने त्याच्याकडे येतो आणि जातो मात्र त्याच्या मुर्खपणामुळे". कष्टाने पैसा येतो हे माझ्यामते पूर्णपणे सत्य नाही. आपल्या आसपास आपण कितीतरी अशी माणसे पाहतो जे कष्टाला वाघ असतात पण फारशी सधन नसतात. मनुष्याला पैसे मिळणार की नाही हे तो कोणत्या गोष्टीवर कष्ट घेतोय त्यावर अवलंबून आहे. अशी पैसे मिळवून देणाऱ्या गोष्टीवर कष्ट घेण्याची त्या अचूक वेळी बुद्धी होणे हे नशीब. असे मला वाटते. उदाहरणार्थ २००५-०६ च्या दरम्यान ज्यांना पुण्यामध्ये २-४ फ्लॅट घेण्याची बुद्धी झाली ते आता चांगल्या परिस्थितीत आहे आणि ज्यांनी २००१४-१५ च्या दरम्यान फ्लॅट घेतले ते अजूनही वाट बघतायेत. कष्ट दोघांनीही केले, एकाच गोष्टीवर केले पण वेळ महत्वाची.
---



त्यामुळे माझे मत असे आहे कि जर पैसा नसेल तर कष्टाला पर्यायच नाही. कष्ट करत राहणे आणि सजगपणे संधी शोधणे आणि नेमके त्या वेळी त्या गोष्टीवर कष्ट घेणे महत्वाचे.

"आंब्याचे झाड लावले आजोबाने आणि आंबे खातोय नातू" असे होतेच. त्यामुळे आपल्या स्वतःच्या पिढीकडे फार श्रीमंती नाही याने निराश न होता "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे" चालू ठेवावे. कारण बऱ्याचवेळा एखाद्या कुटुंबाची आर्थिक सधनता पिढीजात - Generational असते. एका पिढीने कमावले दुसर्या पिढीने वृद्धिंगत केले असे होते. "मुलांसाठी जास्त पैसे कमावून ठेवू नयेत, बापाने कमावलेला पैसा मुलाने उडवला" हे असले भिकारडे विचार करू नयेत. अशी उदाहरणे समाजात असतीलही पण त्याही पेक्षा जास्त पिढीजात श्रीमंतीची आहेत. ती फक्त चघळायला गोड लागत नाहीत त्यामुळे त्याची चर्चा जास्त होत नाही. त्यामुळे अशा चर्चांकडे दुर्लक्ष करून पिढीजात - generational wealth तयार करण्याच्या योजना कराव्यात. मुलांना चांगले घडवणे हा देखील या योजनेचा भाग असू शकतो.

ज्यांच्याकडे पैसा आहे ते या परिस्थितीचा, संधींचा, जोखीम घेण्याच्या वाढीव कुवतीचा योग्य वापर करून डोळसपणे, कॅल्क्युलेटेड जोखीम घेऊन पैशाने पैसा कमावतातच.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

मुलांच्या शिक्षणाची तरतूद

निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?

इन्शुरन्स श्रेष्ठ दान