इन्शुरन्स श्रेष्ठ दान
आपले पैसे दान करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता? माझ्यामते दान करण्याचा सर्वात चांगला मार्ग स्वतःचा आणि कुटुंबाचा इन्शुरन्स काढणे. हे उत्तर अपेक्षित नसले तरी पूर्ण वाचा हि विनंती. आपण दान का करतो? एखाद्या गरजवंताला मदत व्हावी, एखाद्या चांगल्या कामाला आपला हातभार लागावा आणि कितीही नाही म्हंटले तरी पुण्य कमावण्यासाठी. नाहीका? मला वाटते इन्शुरन्सचा देखील हाच उद्देश आहे. फरक एवढाच आहे कि ज्या गरजवंताला आपण मदत करतो, भविष्यात तोच गरजवंत आपण वा आपले कुटुंबही असू शकतो. इन्शुरन्स काय आहे, हे सोप्या पद्धतीने समजून घेऊ. एका गावात १०० घरे आहेत. प्रत्येक घर जवळजवळ सारख्याच पद्धतीचे आहे आणि आतल्या सामानासहित एकूण एक लाख रुपयांचे आहे. मागील काही दशकांपासूनचा इतिहास पाहिला तर दर वर्षी या गावातील कुठलीही २ घरे आगीमुळे किंवा वादळाच्या तडाख्यात नष्ट होतात. नष्ट झालेली घरे पुन्हा बांधायला त्या २ दुर्देवी कुटुंबाना १ लाख रुपये खर्च येतो. म्हणजे एकूण २ लाख रुपये लागतात. त्या कुटुंबांचे आर्थिक गणित पुढील काही वर्षांसाठी बिघडून जाते. हे असे वर्षानुवर्षे घडत आहे. त्या गावातील काही हुशार मंडळींनी यावर इन्श...