LIC पॉलिसीज मध्ये फसवणूक होते का?

एलआयसी वितरक ही एक प्रातिनिधिक उदाहरण मानू. खरेतर कोणत्याही कंपनीच्या मग म्युच्युअल फंड्स का असेना, त्या स्कीमची आणि ती विकून त्यात तुम्हाला पडणाऱ्या फीची, त्यातल्या जोखीमीची, वास्तविक परताव्याची आणि त्या वितरकाला होणाऱ्या नफ्याची माहिती उघड केली नाही तर ती फसवणूकच म्हणायची.



एलआयसी वितरक बदनाम आहेत कारण ते सर्वपरिचित आहेत आणि बरीच वर्षे हा व्यवसाय चालू आहे म्हणून. आणि चांगले एजंट देखील आहेत. पण त्यांना ओळखण्यासाठी तुम्हाला तेवढे ज्ञान हवे ना.

खालील लेख पूर्ण वाचा. मी LIC वर टीका जरी केली आहे तरी शेवटी त्यांच्यातर्फे बॅटिंग देखील केली आहे.

तर एलआयसी एजंट फसवतात म्हणजे नक्की काय? ते आपल्या अज्ञानाचा फायदा घेतात. आपल्याला अज्ञान नसेल तर कसेकाय फसवणार? म्हणून जोपर्यंत तुम्हाला एलआयसी, म्युच्युअल फंड्स, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या गोष्टी कळत नाहीत आणि योग्य प्रश्न विचारता येत नाहीत, तोपर्यंतचांगल्या बँकेत एफडी करा आणि शांत राहा. थोडे पैसे आर्थिक ज्ञान मिळवण्यावर खर्च करा.

थोडे आर्थिक ज्ञान वाढले कि यात आता स्वतःचा "टर्म इन्शुरन्स" काढा आणि परत शांत राहा.
आणखी थोडे आर्थिक ज्ञान वाढले कि कुटुंबाचा "आरोग्य विमा" काढा आणि परत शांत राहा.

माझे बोलणे बऱ्याच जणांना पटणार नाही. पण एलआयसी एण्डावमेन्ट सारख्या पॉलिसी लॉन्ग टर्म (१६-२५-३० वर्षे) असतात. आपल्याला नक्की काय विकले जातंय, त्यातून टॅक्स किती, इन्शुरन्स किती, वितरकांचे कमिशन किती आणि शेवटी महत्वाचे इन्व्हेस्टमेंट किती त्यातून खरा परतावा किती हे गणित जर समजले नाही आणि काही वर्षांनी समजले, तर पॉलिसी बंद करताना चांगलाच भुर्दंड पडू शकतो.

एलआयसी च्या पॉलिसी प्रामुख्याने इन्शुरन्स आणि गुंतवणूक याचे मिश्रण असते. हे असे मिश्रण म्हणजे ना धड गुंतवणूक ना धड विमा अशा प्रकारची बेचव खिचडी आहे. "इन्शुरन्स चा वापर केला नाही तर पैसे वाया गेले" या संकुचित विचारसरणीमुळे एलआयसी अशा पॉलिसी विकू शकते. 

पहिले तर "मी इन्शुरन्स घेतलाय, पण देवा मला इन्शुरन्स कधी लागूच नये" अशी मानसिकता ठेवा. त्यात वाया जाण्यासारखे काही नाहीच मुळी. इन्शुरन्स म्हणजे एखाद्या गरजवंताला अडीनडीला त्या पैशाचा उपयोग होवो यासाठी गटाने केलेली ती योजना आहे. त्यात पैसे वाया जाण्याचा संबंध नाही. म्हणून तुम्हाला रास्त भावात योग्य कव्हर देणारे "शुद्ध इन्शुरन्स" पर्याय निवडा. हे ऑनलाईन देखील उपलब्ध असतात. आणि वर सांगितल्याप्रमाणे चांगले LIC / इन्शुरन्स वितरक देखील असतात. योग्य प्रश्न विचारून आणि त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली कि तुम्ही त्यांच्याकडून देखील इन्शुरन्स घेऊ शकता.

----

गोलमाल है भाई सब गोलमाल

एलआयसी एजंट पॉलिसी गळी मारण्यासाठी कागदावर थातुरमातुर गणिते करून शेवटी किती पैसे मिळतील याचे आकडे दाखवतात. खरेतर वार्षिक परतावा ५-६ टक्क्यांपेक्षा जास्त नसतो. पण त्याचा उल्लेख न करता किंवा मोघम उल्लेख करून, (अपुऱ्या) इन्शुरन्सला जसेकाय बोनस आहे असे दाखवून तुमचे लक्ष तिकडे जाऊ देत नाहीत. १६-२५ वर्षांच्या पॉलिसी त्या जर आधीच बंद केल्या तर होणारे आर्थिक नुकसान याचा उल्लेख टाळतात. "तुम्ही कधीही सगळे पैसे काढू शकता" अशी चक्क थाप देखील मारली जाते. पॉलिसी घेतल्यावर १५ दिवस लुकआउट पीरियड (म्हणजे जर विचार बदलला तर आपण १५ दिवसात काहीही दंड न देता पॉलिसी बंद करू शकतो) याबद्दल सांगत नाहीत. खरेतर पॉलिसी चिटकवल्यावर दुसऱ्या दिवशी तत्पर आपल्या खात्यातून पैसे जाऊन पॉलिसी चालू केली जाते आणि पुढचे पंधरा दिवस हे एजन्ट देव पाण्यात ठेवून कॅन्सल होऊ नये म्हणून आस लावून बसलेले असतात. माझ्या एका एजंट ने तर "आता मेडिकल टेस्ट चे पैसे वाया जातील" असे सांगून रडगाणे चालू केले होते. अशा प्रकारे इमोशनली मॅनिप्युलेट देखील करतात. एजंटच नाही, तर मला एकूण एलआयसी ची ही पद्धत आवडत नाही. "मुलांच्या शिक्षणासाठी ही पॉलिसी", "मुलीच्या लग्नासाठी ही पॉलिसी" अरे? पैसे ते पैसे तुम्ही कशाला ठरवताय कशासाठी काय ते?

सर्वात जास्त राग मला त्या एजंटांचा येतो जे २०-२१ वर्षाच्या कोवळ्या मुला मुलींना या पॉलिसी चिटकवतात. एका बाईने मला एमएस साठी २-३ वर्षात पैसे लागणार आहेत हे कळाल्यावर देखील २० वर्षाची पॉलिसी चिटकवली. तिने (चुकीचे) सांगितल्याप्रमाणे जेव्हा ३ वर्षांनी मी त्या पॉलिसीतुन पैसे काढण्यासाठी गेलो तर व्याज सोडा, मुद्दलातून १०-२० टक्के कापून उर्वरित रक्कम मिळाली. अशा एजंटांचा का राग नाही येणार?
पण वर म्हंटल्याप्रमाणे, आपले ज्ञान वाढवणे हाच उपाय आहे. कारण हा नाही तर तो तुमचा अज्ञानाचा एक दिवस फायदा घेणार.

बरं या एजंटांना तरी आर्थिक ज्ञान असते का? पॉलिसी विकून मिळणाऱ्या टक्केवारीपुढे यांना बऱ्याचदा माहितीच नसते. "रिड्युस्ड पेड अप" ऑप्शन काय आहे? ते घेऊ का असे विचारा, बघून सांगतो, विचारावे लागेल ही उत्तरे मिळतील. काहीजण पॉलिसी विकल्यावर परत तोंड दाखवायला येत नाहीत.

----

कमिशन बाबूभैय्या कमिशन

हा एवढा खटाटोप हे एजंट लोक का करतात? एखादी नवी पॉलिसी विकल्यावर यांना चक्क २०-२५ टक्के कमिशन मिळते. हा आकडा कमी होत होत ५-६ टक्क्यांवर जाऊन पूर्ण पॉलिसी टर्म पर्यंत यांना कमिशन मिळत राहते. म्हणजे एक पॉलिसी विकली की मीटर डाऊन पुढची १५-२५ वर्षे.



मग या पॉलिसी ला पर्याय काय?

ज्ञान हाच पर्याय.

एफडी, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स.
ईपीएफ, पीपीएफ, गव्हर्नमेंट बॉण्ड्स

थोडे जास्त कळायला लागले की
कमी फी असलेले चांगले म्युच्युअल फंड्स, इंडेक्स फंड्स

आणखी थोडे जास्त कळायला लागले की आपल्या संपत्तीचा (रात्री झोप लागेल एवढा) भाग
चांगल्या कंपन्यांचे शेयर्स

आणि आणखी चांगले कळायला लागले की एलआयसी. हा काय प्रकार?
हो. तुम्ही कशासाठी पॉलिसी घेताय आणि त्यातून टॅक्स बेनिफिट काय आहे, हे जर पक्के माहीत असेल तर वितरकाला विश्वासात घेऊन तुम्ही तुमच्यासाठी चांगल्या डिल्स घेऊ शकता. माझ्या माहितीत असे लोक आहेत की ते फक्त एलआयसीच्या पॉलिसी घेतात. कारण त्यांचा बाकीच्या रिस्की गुंतवणुकीचा कोटा पूर्ण झालेला असतो. ते उच्च टॅक्स ब्रॅकेट मध्ये असतात आणि एलआयसी चा जोखीममुक्त, टॅक्स फ्री परतावा त्यांना फायद्याचा वाटतो.

----

आता थोडे एलआयसी च्या बाजूने बोलतो.

एलआयसीला कितीही नावे ठेवली, तर एक मात्र मान्य करायला पाहिजे की आपल्या समाजात एकूणच अज्ञान जास्त आहे. या अज्ञानाचा फायदा घेऊन कितीतरी चिटफंड वाल्यांनी गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बचतीची अक्षरशः माती केली. संचयनी झाले की समृद्ध जीवन आहेच, ते झाले कि पॅनकार्ड, ते झाले कि मैत्रेय, काहीच नाही झाले तर भ्रष्ट सहकारी बँका, ते झाले की पतपेढीवाले. या सगळ्या लफडेवाल्या लोकांनी नाही म्हंटले तरी आज समाजातल्या प्रत्येक कुटुंबाला लुटले आहे.

अशा सगळ्या लांडग्याच्या मध्ये एलआयसी मात्र गेली कित्येक वर्षे ग्राहकांचे किमान मुद्दल रक्षण (आणि काही पॉलिसीच्या बाबतीत वाजवी परतावा) तरी करत आहे. त्यामुळे मला एलआयसी चे कौतुकच आहे. ज्यांना आजिबातच ज्ञान घ्यायचे नाही, त्यांनी किमान या लफडेवाल्या चिटफंडापासून लांब राहून सजगपणे एलआयसी पॉलिसी एखाद्या प्रामाणिक वितरकामार्फत घेणे हा खूप चांगला मार्ग आहे. वर म्हंटल्याप्रमाणे समाजात चांगले वितरक देखील आहेत. थोडा स्वार्थ बाजूला ठेवून जर प्रामाणिकपणे काही गोष्टी समजून सांगितल्या तर हे वितरक एकप्रकारे आर्थिक ज्ञानदानाचे पुण्य कमावू शकतात.

माझ्या कुटुंबात देखील मंडळींनी माहीत नसताना नातेवाईक सांगतोय, मित्र गळ🎣घालतोय म्हणून असल्या भलत्यासलत्या स्कीम्स मध्ये पैसे टाकले नसते आणि नुसत्या एलआयसी पॉलिसीच घेतल्या असत्या तरी लाखो रुपये वाचून वर फायदा झाला असता.

त्यामुळे प्लीज, इंटरनेट युगाचा फायदा घ्या, गोष्टी स्वतः तपासून घ्या. टीव्ही वर चारदोन मालिका कमी बघा पण युट्युब वर सीए रचना रानडे, अक्षत श्रीवास्तव, प्रतीक चौहान इत्यादी लोकांचे चॅनेल पाहून स्वतःच्या माहितीत वाढ करा. कोरावर आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नोत्तरे करा.




एखादा चांगला अर्थ गुरु शोधा. आर्थिक साक्षर बना.

----


टीप १: कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. आधीच क्षमस्व.

Quora.com वरील मूळ लेख - https://qr.ae/prBwPm

टिप्पण्या

Popular Articles on This Site

मुलांच्या शिक्षणाची तरतूद

निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?

इन्शुरन्स श्रेष्ठ दान