कॅलिफोर्निया गोल्ड रश आणि स्टॉक मार्केट क्लासेस

शेअर बाजारातील तज्ज्ञ मंडळी स्वत: जर मार्केटमधून भरपूर पैसे मिळवत असतील तर ते प्रशिक्षण अभ्यासक्रम (ट्रेनिंग कोर्स) का काढतात? त्यांच्या वर्गामध्ये शिकलो तरी आपले मात्र नुकसान कसे काय होते?


एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत कॅलिफोर्निया प्रांतात सोन्याचे साठे सापडले आणि हे सोने काढण्यासाठी, अल्पावधीत नफा कमवू पाहणाऱ्या स्वप्नाळू लोकांची संपूर्ण अमेरिकेतून तिथे झुंबड उडाली. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाणकाम चालू केल्यावर साहजिकच त्यातल्या काही लोकांचे नशीब उजळले आणि काही लोक तसेच खड्डे खणत बसले. इतिहासात हा कालखंड "गोल्ड रश" म्हणून ओळखला जातो. खड्डे खणून, माती चाळणारे सगळे श्रीमंत नाही झाले. मात्र या झुंबडीला काही चाणाक्ष लोक कुदळ, फावडे, घमेली, जीन्स विकत होते. ते मात्र हमखास श्रीमंत झाले.


चित्र विकिपीडिया वरून साभार

----
भारतात दरवर्षी हजाराहून कमी क्लास १ पोस्ट भरल्या जातात. त्या हजार एक पोस्टच्या जागांसाठी दर वर्षी २०-४० लाखाहून अधिक मुले/मुली लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात. त्यातले लाखो जण पाण्यासारखा पैसा खर्च करून दिल्ली, कोटा अशा शहरात क्लास लावतात. त्यातले ०.००१% च यशस्वी होत असतील.

सरकारचे तसे पाहिले तर या हजार क्लास १ अधिकाऱ्यांच्या पगारापायी दर वर्षी १००-२०० कोटी खर्च होत असतील. पण या क्लासेस ची वार्षिक उलाढाल काही हजार कोटींची आहे. त्यामुळे हे स्पष्टच आहे की हे क्लास चालवणारे या अधिकाऱ्यांपेक्षा कितीतरी पट अधिक कमावतात. या क्लासेसचे बरेचसे संचालक, शिक्षक हे एकतर स्वतः लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास केलेले असतात किंवा शासकीय सेवेतून निवृत्ती घेऊन हे काम करत असतात.

आयआयटी क्लासेसची पण सेम कहाणी.

त्यामुळे जिथे झुंबड आहे अशा गोष्टींमध्ये प्रत्यक्षपणे होणाऱ्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त कमाई त्या झुंबडीला लागणारी संसाधने विकून होऊ शकते. यात चांगले वाईट काहीच नाही. यात कोण कोणाला फसवतो असेही नाही. सगळ्यांना सगळे माहिती आहे. काही स्मार्ट लोक या गोष्टीचा फायदा करून घेतात एवढेच.

खालील व्हिडीओ मध्ये प्रवेश परीक्षांचे क्लास करणाऱ्या शिक्षकांचे पगार कोट्यवधी आहेत हे कळते. त्या क्लास मधून बाहेर पडणाऱ्या ९९% मुलांना त्यांच्या शिक्षकांपेक्षा कमीच कमाई देणाऱ्या नोकऱ्या मिळतील. ही वास्तविकता मुलांना आणि शिक्षकांना दोघांनाही माहिती असेल.




----

९ मे २०२३ अपडेट

हे उत्तर लिहून काही दिवसच झाले आणि योगायोगाने आज "Nightly News With Lester Holt" या बातम्यांमध्ये गोल्ड रश बद्दलच एक बातमी पाहिली. कॅलिफोर्निया मध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे परत नद्या-ओढ्यांच्या जवळ नव्याने जमा झालेल्या गाळामध्ये सोन्याचे कण सापडत आहेत. आणि काही लोक त्याच्यामागे परत कुदळ-फावडी घेऊन निघाले आहेत. या व्हिडीओ मध्ये ही कुदळ फावडी विकणाऱ्या स्टोर मालकाचीच मुलाखत आहे. आहेका नाही गम्मत?



----
१७ जुलै अपडेट 

कुठल्याही व्यवसायामध्ये कॅश फ्लो महत्वाचा असतो. अगदी स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील हातात भांडवल किती आहे? हे महत्वाचे असते. कारण समजा एखादा दुप्पट होणारा शेयर जरी निवडण्यात आला तरी मूळ रक्कम किती होती हा प्रश्न असतोच. उदाहरणार्थ एखाद्याने १ लाख गुंतवले आणि दुप्पट झाले तर २ लाख होतील. त्यात काही त्याचे आयुष्य बदलणार नाही. पण जर हेच कोणी ५० लाखाचे १ कोटी केले तर नक्कीच आयुष्यात फरक पडू शकतो. अर्थात ५० चे २५ लाख होण्याची शक्यता पण आहे. म्हणूनच ज्याच्याकडे तेवढी जोखीम घेण्यायोग्य भांडवल असेल, त्याला स्टॉक मार्केट मध्ये जास्त अनुकूलता असते हे ओघानेच आले. त्यामुळेच, हे क्लास वाले हे सुरुवाती भांडवल जास्तीत जास्त जमा करण्याच्या, त्यांच्या व्यवसायाचा दैनंदिन खर्च चालवण्याच्या, एखाद्या लॉन्ग टर्म शेयर मध्ये टिकून राहण्याच्या उद्देशाने पैसे कमावत असतील तर यात वाईट तर काही दिसत नाही. "कॅशफ्लो इस किंग" असे उगाच म्हणत नाहीत.

----
मूळ कोरा उत्तर - https://qr.ae/pyprXH



टिप्पण्या

Popular Articles on This Site

मुलांच्या शिक्षणाची तरतूद

निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?

इन्शुरन्स श्रेष्ठ दान